नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस. जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत; तर त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे सामर्थ्याचे पाठबळ असणे आवश्यक असते. या संदर्भात आश्विन महिन्यात येणाऱ्या ह्या नवरात्र उत्सवाबाबत एक पौराणिक कथा प्रसिध्द आहे. महिषासुर नावाचा एक राक्षस अतिशय प्रभावी बनला होता. त्याने स्वत:च्या सामर्थ्याच्या बळावर अनेक देवांना व मनुष्यांना त्राहि त्राहि करुन सोडले होते. दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट बनली होती व लोक भयग्रस्त झाले होते. धैर्य घालवून बसलेल्या देवांनी ब्रह्मा, विष्णू व महेश ह्यांची आराधना केली. देवांच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या आद्य देवांना महिषासुराचा राग आला. त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैवी शक्ति निर्माण झाली. सर्व देवांनी जयजयकार करुन, तिचे पूजन केले. तिला स्वत:च्या दिव्य आयुधांनी मंडित केले. ह्या दिव्यशक्तीने नऊ दिवस अविरत युध्द करुन महिषासुराला मारले. आसुरी वृत्तीला संपवून, दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करुन देवांना अभय दिले. ही शक्ती देवता म्हणजेच आपली दुर्गा, जगदंबा, कालीमाता होय. ह्या दिवसात देवी जवळ शक्ती मागावयाची व आसुरी वृत्तीवर विजय मिळवायचा.
नवरात्र / घटस्थापना करण्याविषयी – देवघरात आंब्याच्या पानाचे तोरण लावून, रांगोळी इ. ने देवघर सुशोभित करावे. स्त्रीयांनी डोक्यावरुन स्नान करावे. कर्त्याने धूतवस्त्र किंवा रेशमी वस्त्र नेसून देवासमोर बसून आचमन करावे. देशकाल कथन करुन देवतेच्या नावाचा उच्चार करुन संकल्प करुन उदक सोडावे. यामध्ये घटस्थापना, मालाबंधन, अखंड नंदादीप, सप्तशती पाठ, कुमारीका पूजन यापैकी जे जे करणार आहोत त्यांचा उल्लेख संकल्पात यावा. त्यानंतर महागणपति, कलश, शंख, घंटा यांचे पूजन करावे. देवीची पूजा करताना श्री सूक्ताने अभिषेक करावा. घटावर किंवा देवींवर रोज एक फुलांची किंवा कापसाची माळ बांधावी, त्याच ठिकाणी अंखड नंदादीप लावावा. रोज नैवेद्य दाखवावा. नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो काही वेळेस वाऱ्याने किंवा काजळी काढताना तो विझतो. अशा वेळेस काही अशुभ नसते, तो नंदादीप पुनः लावता येतो.
ललित पंचमी – आश्विन शु. पंचमीस ललिता पंचमीचे व्रत करतात. या व्रताची पूजा करंडकाचे स्वरूपात असलेल्या ललिता देवीची करावयाची असते. 48 दूर्वांची 1 जूडी याप्रमाणे 48 जुड्या वहावयाच्या असतात ललिता त्रिशती नामावली वाचावी. तसेच नवरात्रामध्ये सरस्वतीचे पूजन करण्यास सांगितले आहे. नवरात्रामधील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाष्टमी (महालक्ष्मी) पूजन. या दिवशी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असतो. अशा प्रकारे नवरात्रामध्ये देवीच्या तीनही रुपांची म्हणजे 1) महाकाली 2) महासरस्वती 3) महालक्ष्मीची पूजा करण्याने शक्ति, विद्या व धन सामर्थ्य प्राप्त होते.
विजयादशमी, दसरा, अश्वपूजा, अपराजिता व शमीपूजन, सीमोल्लंघन, विजय मुहूर्त (दुपारी २:१८ ते ३:०४) नऊ दिवस युद्ध केल्यानंतर महिषासुराचा वध करून विजय मिळविला तो विजयादशमीचा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने – आनंदाने साजरा केला जातो. आश्विन शुक्ल दशमीला विजया दशमी म्हणतात. या दिवशी शुंभ-निशुंभ, महिषासूर इत्यादी राक्षसांवर श्रीदुर्गादेवीने विजय मिळविला. श्रीरामांनी रावणावर याच दिवशी मात केली. अर्जुनाने अज्ञातवासात शमीच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे काढून विराटाच्या गाई पळवणाऱ्या कौरवसैन्यावर स्वारी केली व विजय मिळवला, तो याच दिवशी. या कारणाने तिला विजया (विजय मिळवून देणारी) दशमी असे म्हटले जाते. दसरा हा भारतातील एक सार्वत्रिक सण आहे. सर्व जातीचे लोक हा सण साजरा करतात. तसे पाहिले तर हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला दिसतो. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेल्या शेतातले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत.
नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दस-याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. या गोष्टी या उत्सवाचे मूळ कृषिस्वरूप व्यक्त करणा-या आहेत. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात; ही प्रथादेखील या सणाचे कृषिविषयक स्वरूपच व्यक्त करते. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन, अपराजिता देवी पूजन व शस्त्रपूजा करण्याची पद्धति आहे. पूर्वी राजेलोक या दिवशी युद्धात विजय मिळविण्यासाठी सीमोल्लंघन करून मुहूर्त करीत असत. म्हणूनच या दिवशी विजय मुहूर्ताचे विशेष महत्व आहे.
हा मुहूर्त कार्यसिद्धि करणारा मानला जातो. या दिवशी सोनं लुटतात असे म्हणतात. त्यामागे एक कथा आहे ती अशीः वरतंतु ऋषींचा कौत्स नावाचा शिष्य विद्याध्ययन पूर्ण करून घरी जाण्यास निघाला. त्यावेळी त्याने गुरूजींना विचारले की, आपल्याला गुरूदक्षिणा काय देऊ ? तेव्हा ऋषी म्हणाले, गुरूदक्षिणेसाठी मी तुला शिकविले नाही. तरी कौत्स परत परत तेच विचारत होता. शेवटी ऋषी म्हणाले, मी तुला १४ विद्या शिकविल्या तेव्हा १४ कोटी सुवर्ण मुद्रा दे. पण त्या एकाच दात्याने दिलेल्या असाव्यात. त्यावेळी सिंहासनावर असलेल्या रघुराजाकडे कौत्स गेला. पण रघुराजाकडे तेवढी संपत्ती नव्हती. त्याने सर्व संपत्ती यज्ञयागात दान केली होती. अर्थलाभ होणार नाही हे लक्षात येताच कौत्स तेथून परत निघाला. पण हे रघुराजाला पटले नाही. त्याने निश्चय केला की, प्रत्यक्ष इंद्रावर स्वारी करून कौत्साला धन द्यावे. हे इंद्राला कळताच इंद्राने शमी व आपटा वृक्षावर मुद्रांचा पाऊस पाडला. राजाने कौत्साला सांगितले की, या सर्व मुद्रा घेऊन जा. कौत्स म्हणाला मला फक्त १४ कोटीच मुद्रा पाहिजेत. तेवढ्या मुद्रा घेऊन तो गेला. उरलेल्या मुद्रांचे काय करावे असा प्रश्न रघुराजाला पडला. कारण या सर्व मुद्रा खरें पाहता कौत्साच्या होत्या. म्हणून मग त्याने त्या लोकांना लुटून नेण्यास सांगितले. तो दिवस विजयादशमी (दसरा) होता. म्हणून सोने लुटणे असा शब्द रूढ झाला. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी दसऱ्याच्या संदर्भात पुराणात कथन केलेल्या आहेत. दुर्गानवरात्र संपल्यानंतर हा दिवस येतो, म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही मानतात. काही घराण्यांतले नवरात्र नवमीच्या दिवशी, तर काहींचे दशमीच्या दिवशी विसर्जित होते.
सीमोल्लंघन – अपराण्हकाली गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमी वृक्ष किंवा आपटा असेल, तिथे थांबतात. मग शमीची पूजा करतात. पुढील श्लोकांनी शमीची प्रार्थना करतात –
शमी शमयते पापं शमी लोहितकण्टका । धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ।।
करिष्यमाणयात्रायां यथाकालं सुखं मया । तत्र निर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ।।
अर्थ – शमी पापांचे शमन (नष्ट) करते, रामाने जिचे पूजन आणि गुणवर्णन केले आहे अशी शमी अर्जुनांच्या बाणांना धारण करणारी (बाणांना सांभाळणारी) आहे. हे शमी, तू माझी (विजय) यात्रा निर्विघ्न आणि सुखकारक कर.
आपट्याची पूजा करायची असल्यास पुढील मंत्र म्हणतात –
अश्मन्तक महावृक्ष महादोषविवारण । इष्टानां दर्शनं देहि कुरू शत्रुविनाशनम् ।।
अर्थ – हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. दस-याचा दिवस हा सर्व शुभ कार्यांना प्रशस्त मानतात. दशमी तिथी श्रवण नक्षत्राने युक्त असेल, तर तो दिवस अतिशुभ होय. म्हणूनच दस-याला साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानलेले आहे.
याप्रमाणे यावर्षी 15 ऑक्टोबर रोजी, रविवारी घटस्थापना, नवरात्रारंभ करावा, घटस्थापना सकाळी सूर्योदयानंतर दुपारी 1:48 पर्यंत करता येईल. 19 ऑक्टोबरला ललिता पंचमीचे पूजन करावे. 21 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) व सरस्वती पूजन करावे, 23 ऑक्टोबर रोजी सोमवारी नवरात्रोत्थापन असून 24 ऑक्टोबर रोजी मंगळवारी विजयादशमी (दसरा) उत्सव साजरा करावा.