Kosha

Kosha

by Date Panchang

To see our Services visit our website

आरोग्यासाठी चातुर्मास

Ekadashi wide
आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंतच्या कालावधीस चातुर्मास असे संबोधले जाते. यावर्षी श्रावण महिना अधिक असल्याने हा कालावधी ५ महिन्यांचा असणार आहे. दिनांक 29 जून 2023 रोजी चातुर्मासाचा आरंभ होत असून 24 नोव्हेंबर 2023 रोजी चातुर्मास समाप्ती होईल. या चातुर्मासाच्या कालावधीत अनेक सणव्रते येतात. धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या या कालावधी संबंधी अधिक माहिती आपण खाली पाहू.
चातुर्मासाचा आपल्या पूर्वजांना अभिप्रेत असलेला अर्थ आपण समजावून घेतला पाहिजे. चातुर्मासातील व्रतवैकल्ये आपले पूर्वज मोठ्या श्रद्धेने करीत होते. त्याचे कारण यामागील विज्ञान त्यांना माहीत होते. विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. हिंदु धर्मात व संस्कृतीत व्रत वैकल्ये, सणवार, उपासना, उपवास याची पूर्वजांनी ऋतुपरत्वे उत्तम सांगड घातली आहे, ज्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत नाही व आपले आरोग्य सांभाळले जाते.
मृग नक्षत्रापासून पावसाला सुरुवात होते आणि पुनर्वसु नक्षत्रापासून सतत आभाळी हवा व कधी झिमझिम तर कधी जोरदार पाऊस पडत असतो. असे हवामान असण्याचा काळ आषाढ ते कार्तिक आहे. या काळात पचन नीट होत नाही व भूकही मंदावते. या दृष्टीने कमी खावे असे सांगितले तर कोणी ऐकणार नाही म्हणून या सर्व गोष्टी धर्माशी निगडित केल्या आहेत. अमुक करावे हा विधि व अमुक करू नये हा निषेध, असे विधिनिषेध आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे. वास्तविक धर्म आपल्या रक्तात पूर्वापार भिनलेला आहे. अनेक गोष्टींना आपण धर्म म्हणतो. उदाहरणार्थ - स्वभावधर्म, सखल भागाकडे वाहत जाणे हा पाण्याचा धर्म आहे. धर्म म्हणजे वास्तविक काय आहे? श्रीमदाद्य शंकाराचार्यांनी १) उत्कृष्ट समाज व्यवस्था राहणे २) प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नति ३) पारमार्थिक उन्नति होणे या तीन बाबी ज्यामुळे साध्य होतात तो धर्म अशी व्याख्या केली आहे. यादृष्टीने प्रत्येक कर्माची रचना केली आहे व तीही तत्वज्ञानाला धरुन केली आहे. हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.
भारतावर बरीच आक्रमणे झाली पण ती बळाची आक्रमणे होती. ती सर्व पचवून लोकांनी आपला धर्म टिकविला होता. पण ब्रिटीशांनी केले आक्रमण हे वैचारिक आक्रमण होते. आपल्या धर्माविषयी त्यांनी जे सांगितले ते सर्व बरोबर आहे व आपला धर्म हा बावळटपणाचा आहे असे वाटू लागले. दुर्दैवाने त्यावेळचे आपले पुढारीही तसेच बोलू लागल्याने लोकांची धर्मावरील श्रद्धा कमी झाली. ब्रिटिशांनी आपल्याला प्रज्ञाहीन केले, त्यामुळे गेली काही वर्षे हा अश्रद्धेचा काळ होता. सुदैवाने तो काळ आता संपला असून लोकांत पुनश्च श्रद्धा निर्माण झाली आहे. ओस पडलेली मंदिरे पुन्हा गजबजली आहेत. अशा वेळी लोकांना खरा धर्म म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, आपला धर्म श्रेष्ठ का आहे? मानवी जीवनाच्या सर्वांगांचा परिपूर्ण विचार धर्माने कसा केला आहे? हे सांगून त्याच्या श्रद्धेला शास्त्रीय वळण लावणे जरूर आहे.
परमेश्वरांनी ही सृष्टी निर्माण केली ती चिरकाल चालण्याकरिता जे नियम त्यांनी निर्माण केले त्याला शास्त्र म्हणतात. 'शास्तीति शास्त्रम्। जे माणसांना शिस्त लावते ते शास्त्र, जीवनात शिस्त नसेल तर माणूस आणि जनावर यात अंतर राहणार नाही. व्यावहारिक, धार्मिक, नैतिक, पारमार्थिक या सर्व क्षेत्रात शिस्त पाहिजे हे कोणीही मान्य करील ती शिस्त लावून मानवी जीवन कृतार्थ कसे करावे, हे धर्मशास्त्र सांगते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे. पण तो पाळला जात नाही. म्हणून निदान चातुर्मास्यात तरी ते पाळले जावेत म्हणजे आस्ते आस्ते नेहमीच संयमित वागता येईल. हा चातुर्मास्य व्रते सांगण्याचा शास्त्राचा हेतु आहे. चातुर्मास्याची सुरुवात आषाढ शुद्ध एकादशीपासून होते कार्तिक शुद्ध एकादशीला तो संपतो. आषाढ शुद्ध एकादशीला शयनी एकादशी तर कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी अशी नावे दिली आहेत. याचा अर्थ असा की, आपले एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असतो. जसजसे वर जावे म्हणजे एका डायमेन्शनमधून दुसऱ्या डायमेन्शनमध्ये जावे, तसतसे काळाचे परिमाण वाढत असते. हे आता अंतरिक्षयात्री चंद्रावर जाऊन आल्यावर त्यांना आलेल्या अनुभवावरुन सिद्ध झाले आहे. उत्तरायण हा देवांचा दिवस आहे तर दक्षिणायन ही रात्र आहे. सामान्यतः आषाढ ते मार्गशीर्ष दक्षिणायन असते म्हणजे देवाची रात्र असते म्हणून देव शयन करतात. उत्तरायण सुरू होण्यापूर्वी म्हणजे दिवस सुरू होण्यापूर्वी म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला देवांची पहाट सुरू होते. देव त्यावेळी उठतात म्हणून त्या एकादशीला प्रबोधिनी असे नाव आहे. या शयन काळात असुरी प्रवृत्तीची वाढ होत असते. (असूर याचा अर्थ येथे, रोग अनारोग्य असा होतो.) जास्त खावे असे माणसांना वाटत असते. पण त्याचे परिणाम आरोग्यदृष्ट्या अपायकारक आहेत. खरे असे आहे की, खाण्यावर जर माणसाने नियंत्रण ठेवले तर त्याची प्रकृति कधीही बिघडणार नाही. पण भरमसाट हॉटेलिंग वाढलेल्या या काळात माणसांना हे पटणे कठीण. प्रकृति बिघडल्यावर ते पटते पण त्यावेळी पटून काही उपयोग नसतो. पण निदान चार महिने तरी पाळा. हवामान प्रतिकूल असते. असुरी प्रवृत्ति वाढते ती वाढू नये. मानवी जीवनाची परिणति देव जीवनामध्ये व्हावी हा शास्त्राचा हेतु आहे. व्रियते स्वर्गः, व्रजति स्वर्गमनेन वा ।। म्हणजे ज्याच्यामुळे स्वर्गप्राप्ति होते किंवा मनुष्य स्वर्गाला जातो त्याला व्रत म्हणतात. स्वर्गलोकीचे सुख येथे इहलोकी मिळून जीवन समृद्ध व्हावे याकरिता व्रते करावयाची. वैकल्ये म्हणजे शरीर कृश म्हणजे हलके पण चिवट होणे. स्थूल शरीराची माणसे फार काम करु शकत नाहीत. थोडे काम केले तरी लगेच दमतात. कृश (एकशिवडी) व चिवट माणसे खूप काम करु शकतात व दमत नाहीत. व्रताने असे होते म्हणून व्रत व वैकल्य या शब्दांची सांगड घातली आहे. व्रतांचे हेतु - व्रतांमुळे संयम निर्माण होतो. मन विषयापासून परावृत्त होते, बुद्धीचा विकास होतो. ज्ञानतंतूंचा विकास होतो. रोग परिहार होतो. दीर्घायुष्य प्राप्त होते. संकल्प शक्ति वाढते. आत्मविश्वास वाढतो. भक्ति उत्पन्न होते व मोक्ष प्राप्ति होते. व्रते ही शारीरिक, वाचिक व मानसिक अशा तीनही प्रकाराने करावयाची असतात. शारीरिक - देव ब्राह्मण, गुरु व विद्वान यांचे पूजन व उपवास करणे. कोणतेही व्रत म्हटले की, उपवास हा आलाच. कारण उपोषण हे व्रताचे अंग आहे. उपोषण म्हटले की कित्येक लोकांच्या अंगावर काटा येतो. वास्तविक उपोषणाने पचनशक्तीस विश्रांति मिळून ती अधिक कार्यक्षम होते. महिन्यातून निदान दोन वेळ उपोषण करणाऱ्यांपासून रोग दूर पळतील. पण याची योग्य जाण नसल्याने माणसे केव्हाही व कितीही खात असतात. भुकेने किंवा खावयास पुरेसे अन्न न मिळाल्याने जेवढे मृत्यु होतात त्यापेक्षा जास्त खाण्याने अधिक लोक मृत्युमुखी पडतात, अधिक खाण्यातूनच मोठी दुखणीही उद्भवतात. म्हणून अल्पाहारः क्षेमकरः असे आयुर्वेदाने सांगितले आहे. उपवासाचा हेतु - "विषया विनर्तते निराहारस्य देहिनः। निराहार करणाऱ्यांचे मन विषयापासून परावृत्त होते. विषय वासनेचे उगमस्थान मन हे आहे. म्हणून त्यालाच परावृत्त करावे लागते. अन्यथा अधिक विषयोपभोगाने शरीर व बुद्धी यांची हानि होऊन वार्धक्य लवकर येते. सध्या अनेक साधनांमुळे माणसांचे कष्ट किती तरी कमी झाले आहेत. व्यायाम करीत नाहीत. भरपूर खायचे व बसून रहावयाचे. त्यामुळे मेद म्हणजे स्थूलपणा वाढत आहे. त्यामुळे शरीर बेडौल व अकार्यक्षम होते. ही स्थूलता घालविण्यासाठी म्हणजेच वजन कमी करण्यासाठी डायटिंग करतात. हे डायटिंग बरेच दिवस करावे लागते व उलट त्याचाच त्रास होतो. त्यापेक्षा व्रत करुन उपोषण करणे चांगले. कारण त्यामुळे वजन तर कमी होतेच व पुण्यसंचयही होतो. उपोषण हे अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्याधीवर उपयुक्त आहे. आपल्या शास्त्रांनी व्रत व उपवास यांची सांगड माणसाच्या आरोग्य रक्षणाकरिता किती विचारपूर्वक व कितीतरी वर्षांपासून घातली आहे. पण आपले ते बावळटपणाचे ही समजूत अद्यापही जात नाही. आपल्या पूर्वसुरींनी काहीही विचार न करता काही तरी सांगितले आहे, असे मुळीच नाही. पण साहेबांनी सांगितले म्हणजे पटते ही आपली मनोवृत्ति बनली आहे. सध्याच्या यांत्रिक व धकाधकीच्या जीवनात उपोषण करणे कठीण होते असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्याकरिता शास्त्राने फलाहार, एकभुक्त, नक्त (म्हणजे सूर्यास्तानंतर एकदा जेवणे) अयाचित व हविष्यान्न असे उपाय सांगितले आहेत. पुत्रवान गृहस्थ माणसाने काहीही न खाता पिता उपोषण करु नये, असा निषेध आहे. करता उपोषणाच्या पदार्थापकी एखादा पदार्थ थोडा खाऊन एकदा पाणी प्यावेच. वाचिक - मितभाषण करणे, मृदु व सत्य बोलणे, मौन धारण करणे, जप करणे, सत्य व मित भाषणाने वाचेत सामर्थ्य निर्माण होते. मानसिक - सरलता, अस्तेय, ब्रह्मचर्य व मनाची प्रसन्नता ठेवण्याने अंतःकरणातील भाव शुद्ध होतात. कायिक, वाचिक, मानसिक या गोष्टी चार महिने निदान व्रतांचे दिवशी तरी कराव्यात म्हणजे हळूहळू तो स्वभाव होतो. व्रताचे प्रकार - नित्य, नैमित्तिक व काम्य असे व्रतांचे तीन प्रकार आहेत. विनायकी, संकष्टी, एकादशी, प्रदोष, शिवरात्री, गुरुवार, शनिवार ही नित्य व्रते आहेत. वटपूर्णिमा, मंगळागौरी, हरितालिका, गणेश चतुर्थी, ऋषिपंचमी, कोजागरी ही नैमित्तिक व्रते आहेत. सत्यनारायण सोळा सोमवार ही काम्य व्रते आहेत. चातुर्मास्य व्रते - गोपद्म काढणे, शाकव्रत, कापसाचे वस्त्र समर्पण, पंचायतन पूजा, देवाला व तुळशीला प्रदक्षिणा, तांबूलदान, वाती लावणे, दिशा बदलून भोजन करणे, मंदिर झाडून सडा घालून स्वस्तिक, कमळ, गाय इत्यादि रांगोळ्या काढणे, नंदादीप लावणे, नित्यदान, गोग्रास, गोपूजन, पळसाच्या, केळीच्या इत्यादि पानावर जेवणे, पिंपळाचे पूजन करणे, नामस्मरण, पुराण श्रवण इत्यादि. असा हा पुण्यकारक, आरोग्यदायी चातुर्मास शक्य तितक्या श्रद्धेने यातील व्रतांचे आचरण करून घालवावा.